- नवीन सदस्य नियुक्तीची कार्यवाही सुरु?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२१) :- सभेला गैरहजर राहिल्याने भाजपचे भोसरीतील नगरसेवक रवी लांडगे यांचे महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्यपद रद्द केले जाणार आहे. समितीच्या अध्यक्षपदासाठी दावेदार असताना डावलण्यात आल्यामुळे ते नाराज झाले होते. त्यानंतर समितीच्या बैठकांना हजर न राहिल्याने नियमानुसार त्यांचे सदस्यपद रद्द होणार आहे.
त्यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिला होता. दरम्यान, त्यांचा राजीनामा पक्षाकडून मंजूर झाला नाही. त्यामुळे ते सदस्यपदावर कायम होते. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आता त्यांचे सदस्यपद रद्द होत आहे.
नियमानुसार स्थायी समितीचा कोणताही सदस्य सलग २ महिने सभांना गैरहजर राहिल्यास सदस्यपद रद्द होते. या प्रमाणे रवी लांडगे मार्च महिन्याच्या पहिल्या बैठकीपासून आजपर्यंत स्थायी समितीच्या सभेला हजर राहिलेले नाहीत. नियमानुसार त्यांचे सदस्यपद रद्द होत आहे. प्रशासकीय पातळीवर नवीन सदस्य नियुक्तीची कार्यवाही सुरू झाली आहे.