- टायगर ग्रुपचा अध्यक्ष, होमगार्ड व ग्रामसुरक्षा दलाचा सदस्य गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२१) :- गर्भपाताच्या गोळ्यांचे किट असलेले औषधांचे पाकीट दुकानात ठेवल्याने खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी भीती दाखविली. तसेच धमकी देऊन पाच ते सहा लाख रुपये देण्याची मागणी केली. त्यासाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण केले. याप्रकरणी टायगर ग्रुपचा अध्यक्ष, होमगार्ड आणि ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यासह सात जणांना अटक केली आहे. वाकड येथे मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
अशोक बेलीराम आगरवाल (वय ५३, रा. विकासनगर, किवळे) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. १६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, टायगर ग्रुपचा अध्यक्ष सिद्धार्थ भारत गायकवाड (वय ३२), राहुल छगन लोंढे (वय २४), प्रकाश मधुकर ससगाणे (वय ३१), ग्रामसुरक्षा दलाचा सदस्य प्रीतेश बबनराव लांडगे (वय ३०), कमलेश राजकुमार बाफना (वय ३२), संतोष बापू ओव्हाळ (वय २८, सर्व रा. वाकड) आणि होमगार्ड असलेला आकाश विजय हारकरे (वय २७, चिखली), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयाने पोलीस काेठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे संगनमत करून फिर्यादीच्या डांगे चौकातील स्पंदन मेडिकलमध्ये आले. पोलीस असल्याचे भासवून आरोपींनी मेडिकलमधील कपाटातील एमटीपी किट, औषधाचे पाकीट व दोन फाइल ताब्यात घेतल्या. या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास तुमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्व हॉस्पिटलला येरवडा कारागृहाची हवा खावी लागेल, अशी भीती दाखविली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसविले. दत्त मंदिर रोड, वाकड या परिसरात फिरवून फिर्यादी आणि डॉ. खरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच एका तासामध्ये पाच ते सहा लाख रुपये देण्याची मागणी केली.