- चिंचवडच्या ऑटो क्लस्टर परिसराला महत्व येणार..
- पालिका ७ एकर जागेत कामकाजासाठी उभारणार १३ मजली प्रशस्त इमारत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील ऑटोक्लस्टरमधील मोकळ्या जागेत महापालिकेची १३ मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादरीकरण दाखवण्यात आले असून यासाठी त्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. लवकरच इमारतीसाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील पालिका भवनाची इमारत कामकाजासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन प्रशस्त इमारत बांधण्याचे नियोजन प्रशासनाने आयटूआरअंतर्गत ताब्यात आलेल्या महिंद्रा कंपनीच्या गांधीनगर, पिंपरी येथील जागेत इमारत बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यांची निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली होती. मात्र, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या दर्शनी भागात पालिकेची प्रशस्त व देखणी इमारत असावी, अशी सूचना केली. त्यामुळे शोध सुरू केला. गांधीनगरचा प्रस्ताव बारगळला. पर्यायी नेहरूनगर, पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबॉयोटिक्स (एचए) कंपनीची जागा ताब्यात नसल्याने ते ठिकाणही रद्द करण्यात आले.
आता चिंचवडच्या क्लस्टर येथील पालिकेच्या जागेत इमारत बांधण्याचा निर्णय झाला आहे. त्यास पालकमंत्री पवार यांनीही पसंती दिली आहे. तेथे ऑटो क्लस्टर सायन्स पार्क तारांगण हे महत्वाचे प्रकल्प आहेत. पालिकेची एकूण ३५ एकर जागा आहे. त्यापैकी ७ एकर जागेत १३ मजली प्रशस्त इमारत उभारण्यात येणार आहे. त्यात पालिकेचे सर्व विभागासह महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांचे दालन असणार आहेत. तसेच, प्रशस्त सभागृहासह पार्किग, कॅन्टीन आदी अद्ययावत सोई असणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया येत्या दीड महिन्यात सुरू केली जाईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.