- कायम कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार वेतन व भत्ते; सभेत मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२१) :- कोरोना महामारीच्या काळात महापालिकेच्या रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना महापालिका आस्थापनेवरील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासह सुविधा दिल्या जाव्यात, असा ठराव उपसूचनेद्वारे सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (दि.१८) मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
कोरोना महामारीच्या काळात महापालिकेच्या रूग्णालयात कंत्राटी व मानधन पद्धतीने डॉक्टर, परिचारिका व इतर मनुष्यबळाने जिवाचा विचार न करता अहोरात्र काम केले. त्यांना मानधन अपुरे असल्याने त्यांच्यात रोष निर्माण झाला आहे. त्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सर्व सुविधा मिळाव्यात, अशी उपसूचना सत्ताधारी भाजपने मंजूर केली.
कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना वेतन, भत्ते, विमा संरक्षण आणि इतर लाभ दिले जावेत, असे ठरावात नमूद आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी ठरावास मान्यता दिल्यास कंत्राटी डॉक्टर, परिचारिका व इतर मनुष्यबळास सुविधांचा लाभ मिळू शकणार आहे.