- मात्र, बंदीमुळे यंदाही पर्यटकांना भिजण्याचा आनंद घेता येणार नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२१) :- पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले लोणावळ्यातील भुशी धरण शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे. स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरील दोन मोऱ्यांची माती काढत धरणातील पाण्याला सांडव्यावरून वाहण्यासाठी वाट मोकळी करून दिली.
मात्र, पर्यटनबंदी आदेशामुळे पर्यटकांना धरणाच्या सांडव्यावर जाऊन भिजण्याचा आनंद यावर्षी देखील घेता येणार नाही, अशी चिन्हे आहेत. मागील वर्षीपासून पर्यटनस्थळे असल्याने भुशी धरण पर्यटकांना मुकले आहे. यावर्षी देखील अद्याप पर्यटनबंदी कायम असल्याने धरणावर जाणारा मार्ग बंद केले आहे.
लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनीत कौंवत म्हणाले, लोणावळ्यात लोणावळा शहर व मावळ तालुक्यात गुरुवारपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगर भागातून मोठे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. यामुळे आकाराने लहान असलेले भुशी धरण दोनच दिवसांत ओव्हरफ्लो झाले आहे. पर्यटकांना येण्यासाठी कोणतीही बंदी नाही. मात्र त्यांना कोणत्याही पर्यटनस्थळांवर जाता येणार नाही. महाराष्ट्र शासन व पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये संचार व जमावबंदीचे आदेश तसेच पर्यटनस्थळे बंदचे आदेश लोणावळ्यात लागू आहे. पर्यटक लोणावळ्यात येऊ शकतात, हॉटेल बंगले व फार्महाऊस येथे नियमांचे पालन करून राहू शकतात. मात्र त्यांना पर्यटनस्थळांवर जाता येणार नाही.