- आयुक्तांशी चर्चा करून विषय लवकरात लवकर मार्गी लावू – आ. बनसोडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२१) :- कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासन आदेशाप्रमाणे काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी आज पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आशा स्वयंसेविकेचे काम करणाऱ्या सेविकांना प्रति दिन ५०० रुपये भत्ता पालिकेने मंजूर करावा आणि त्यांना किमान वेतन लागू करावे या प्रमुख मागण्या आमदार बनसोडे यांच्यासमोर मांडल्या.
आशा सेविकांना कोरोना काळात रविवारसह आठवड्यातील सातही दिवस दररोज आठ तासप्रमाणे काम करून घेतले जाते, ते ही विनामोबदला. ही गोष्ट अत्यंत चुकीची व खेदजनक असून यावर तोडगा काढण्यासाठी स्वतः आयुक्तांशी चर्चा करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासन आमदार अण्णा बनसोडे यांनी उपस्थित आशा व गटप्रवर्तक यांना दिले. कोरोना योद्ध्यांचा दर्जा देऊन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान वेतन कसे देता येईल यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून न्याय दिला जाईल, असेही असे आमदार म्हणाले.
यावेळी शालिनी शिवशरण, संगीता मोरे, प्रिती रोडे, वर्षा शेगोकर, किरण सोनवणे, ममता येल्लाडे, सरिता गोळे, सुवर्णा पवार, क्रांती होलमुखी, भाग्यश्री जाधव, कल्पना जाधव, नीलम जाधव, रोहिणी भेगडे, शोभा पांचाळ इत्यादी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.