- भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२१) :- भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज पिंपरी चिंचवडमधून ओबीसी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा हा ‘व्होट बँकेचा’ नसून भाजपच्या मुळ तत्वांचा, सन्मानाचा आणि संस्काराचा असल्याचे त्या म्हणाल्या. २६ जून रोजी होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाने शहर दणाणून सोडा असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने २६ जून रोजी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी पिंपरी चिंचवड शहरात भाजपाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. बैठकीस शहराध्यक्ष व आ. महेश लांडगे, आ. लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, उमाताई खापरे, सदाशिव खाडे आदी उपस्थित होते.
त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुंडे म्हणाल्या, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा हा ‘व्होट बँकेचा’ नसून भाजपच्या मुळ तत्वांचा, सन्मानाचा आणि संस्काराचा आहे. येत्या २६ जून रोजी होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाने शहर दणाणून सोडा, असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. बहूजनांना ताकद देण्याचे काम ज्यांनी केले, ओबीसींच्या आरक्षणाचा पाया ज्यांनी रचला त्या छत्रपती शाहू महाराज यांच्या २६ जून हया जन्मदिवशी आम्ही सामाजिक न्यायाची मागणी करत आहोत. राज्य सरकारने मागासवर्ग आयोग स्थापन करून तसेच इम्पेरिकल डाटा तयार करून आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मात्र, ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची या सरकारची नियत नाही. असा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.
सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाहीत हा नारा घेऊन आम्ही २६ जूनच्या रास्ता रोको आंदोलनात ताकदीनिशी उतरायचे आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभाग घेऊन शहर दणाणून सोडावे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले.