न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जून. २०२१) :- रावण गँगकडून कोरबू गँगच्या सदस्यावर गोळीबार केला होता. त्यामुळे पुन्हा हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी कोरबू गँगच्या म्होरक्याने दोन पिस्तूल आणले होते. मात्र, याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्याकडून दोन पिस्तूल व पाच काडतूस हस्तगत केली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सांगवी परिसरात ही कारवाई केली.
मोहम्मद उर्फ मम्या मेहबूब कोरबू (वय २३, रा. उर्वे होसींग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या म्होरक्याचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी रावण गँगच्या गुंडानी कोरबू गँगच्या आकाश दोडमणी या तरुणावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्याच्या पायावर गोळी लागली होती.
खंडणी विरोधी पथक सांगवी परिसरात गस्त घालत असताना पोलिस कर्मचारी संदीप पाटील, शैलेश मगर व सुधीर डोळस यांना त्यांचे बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील तडीपार गंड मोहम्मद कोरबु हा औंध परिसरात थांबलेला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळ लावून त्यास ताब्यात घेतले. कोरबूला न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी देण्यात आली. तपासा दरम्यान कोरबूकडून आणखी एक पिस्तूल आणि दोन काडतूसे असे एकूण ८० हजारांचे दोन पिस्तूल आणि एक हजार रुपयांची पाच जिवंत काडतूसे पोलिसांनी हस्तगत केली.
मोहम्मद कोरबू हा सराईत गुन्हेगार असून याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याल ३१ ऑक्टोबर २०२० रोजी पासून दोन वर्षाकरीता पिंपरी चिंचवड पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली होती.