न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसें.) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगवीतील पी. डब्ल्यू. डी. मैदानावर पवनाथडी जत्रेचे (दि. ४ जाने ते ८ जाने.) या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी महिलांसाठी पुरेसे व स्वच्छ स्वच्छतागृह, पुरेसे आकाराचे स्टॉल, महापालिकेची सुरक्षा व पोलीस सुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत म्हणून, मनपाची रुग्णवाहिका व अग्निशामक दलाचा बंब ठेवण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, या पवनाथडी जत्रेमध्ये बहुतांश महिलांचा सहभाग असल्यामुळे महिला स्वच्छतागृहाची पुरेशी व्यवस्था असणे गरजेचे आहे. परंतु, महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नसतात. असलेली स्वच्छतागृहे वेळोवेळी स्वच्छ केली जात नाहीत. त्यामुळे पवनाथडीमध्ये आलेल्या महिलांची कुचंबणा होते. तसेच पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था नसते. त्यामुळे महिलांची छेडछाड, साखळी, पर्स हिसकावणे असे प्रकार दरवर्षी घडतात. त्यामुळे सर्वसामान्य महिलांना आर्थिक भुर्दंड बसतो. तसेच वाटप केलेले स्टॉलही छोटे असतात. त्यामुळे या महिलांना त्यांचा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने गैरसोईचे होते. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत जातीने लक्ष घालून कार्यवाही करण्याची मागणी दत्ता साने यांनी आयुक्तांकडे केली आहे.











