न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जाने.) :- पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने ४ ते ८ जानेवारी दरम्यान पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. पवनाथडी जत्रेचे यंदा १२ वे वर्ष असून सांगवीतील पीडब्ल्युडी मैदानावर ४ ते ८ जानेवारी या कालावधीत जत्रा भरणार आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते या जत्रेचे उद्घाटन होणार आहे
दरम्यान, पवनाथडी जत्रेमध्ये शनिवार (दि. ५) सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम व सायंकाळी सात वाजता लावण्य दरबार हा लावण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. रविवारी (दि. ६) सायंकाळी पाच वाजता लिटील चॅम्स, सारेगमप कलाकार यांचा व सायंकाळी सात वाजता बॉलीवूड स्टार्स, हिंदी जुनी गीते, कव्वाली व गजल कार्यक्रम सादर होणार आहे. सोमवारी (दि. ७) सायंकाळी पाच वाजता धडाकेबाज सखी हा महिलांसाठी खास पैठणीचा कार्यक्रम व सायंकाळी सात वाजता गायन, वादन व नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे.
मंगळवारी (दि. ८) सायंकाळी पाच वाजता देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम; तर सायंकाळी सात वाजता कलाअविष्कार, मराठी चित्रपट गीते, भावगीते ह्या कार्यक्रमाने पवनाथडी जत्रेची सांगता होणार आहे. हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असून कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे यांनी केले आहे.











