न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जाने.) :- महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून पालिका स्थापनेपासून व्यायामशाळा कार्यरत आहे. कर्मचा-यांच्या शारिरीक स्वास्थ्याबरोबरच त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत आहे. ही बाब मनपाच्या दृष्टीने लाभदायक आहे. या व्यायाम शाळेमध्ये अत्याधुनिक सोई सुविधा पुरविणे गरजेचे असताना, महापालिका या व्यायामशाळेचे स्थलांतरण करण्याच्या तयारीत आहे. त्यास विरोध करीत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
त्यात म्हटले आहे की, मुख्यालयातील या व्यायाम शाळेमध्ये मनपाचे बहुसंख्य कर्मचारी सकाळी लवकर व संध्याकाळी कार्यालयीन वेळेनंतर व्यायाम, योगासने करत असतात. मनपाचा संपूर्ण डेटा डिजीटल स्टोअर करण्याकरीता निविदा काढण्यात आलेली आहे. या निविदाचे काम व्यायाम शाळा स्थलांतरीत करुन ती जागा संबंधित ठेकेदारास देण्याचे नियोजन आहे. सदरचा ठेका भाजपाच्या एका नगरसदस्याच्या एका निकटवर्तीने घेतल्याचे समजते. त्यामुळे सदर व्यायाम शाळा स्थलांतरीत करुन कर्मचा-यांची गैरसोय होणार आहे. हा प्रकार गंभीर असून, केवळ भाजप नगरसदस्याच्या निकटवर्तीय ठेकेदाराची सोय म्हणून ही व्यायाम शाळा स्थलांतरीत करुन मनपा कर्मचा-यांवर अन्याय होणार आहे.
मनपा कर्मचा-यांच्या दृष्टीने महत्वाची असणारी व्यायाम शाळा इतरत्र स्थलांतरीत करण्यात येऊ नये. उलट मनपाच्या इतर व्यायाम शाळेसारखे या व्यायाम शाळेमध्ये अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात यावीत. या व्यायामशाळा स्थलांतरणास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे व्यायाम शाळेचे स्थलांतरण रद्द करण्यात यावे. अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे साने यांनी या निवेदनात म्हटले आहे.











