न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२१) :- गवंडी, पेंटर, बिगारी, वायरमन, रस्ते खोदाई आदी बांधमाक करणाऱ्या मजुरांसाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात मोठया प्रमाणात बांधकाम मजूर आहेत त्यांना नोंदणी करण्यासाठी शिवाजीनगर येथील कार्यालयात जावे लागते. त्या ठिकाणी सतत हेलपाटे मारावे लागत आहे.
यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम मजुरांची नोंदणी होण्यास अडचणी येत असून अनेक बांधकाम मजूर योजनेपासून वंचित आहेत. यामुळे माथाडी बोर्डाच्या कार्यालया प्रमाणेच बांधकाम मजुरांचे देखील स्वतंत्र कार्यालय पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्थापन करण्यात यावे, अशी मागणी कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केली आहे.
पिंपळे गुरव संजय गांधी नगर येथेल अण्णाभाऊ साठे स्मारक भवन मध्ये, बांधकाम मजूर रिक्षाचालक फेरीवाले घरेलू कामगार आदी घटकांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.
यावेळी कष्टकरी जनता महिला आघाडी अध्यक्षा अनिताताई सावळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हादभाऊ कांबळे, विलास थोरात, अरुण भोसले, बबन काळे, रिक्षा ब्रिगेडचे प्रवक्ते अविनाश जोगदंड, शगुन चौक अध्यक्ष राजेश मायरामणी आदी उपस्थित होते.