- केंद्राकडे पाठपुराव्यासाठी कागदोपत्री प्रस्ताव पाठवा…
- रसायनमंत्री मांडवियांकडून पिंपरीतील एच ए कंपनीची पाहणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२१) :- केंद्रातून परवानगी मिळाल्यास कोविडवर इंजेक्शन, कॅप्सूलसाठी लागणारा कच्चा माल बनविण्यासाठी एचए कंपनी पुढाकार घेणार आहे. त्यासाठी परवानगी देण्याची मागणी कंपनी व्यवस्थापनाने केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली. या वेळी मंत्री मांडविया यांनी त्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे देण्याच्या सूचना केल्या.
पिंपरीमधील हिंदुस्तान केंद्रीय अँटिबायोटिक कंपनीला रसायनमंत्री मांडविया यांनी भेट दिली. या वेळी कंपनीची सद्यःस्थिती व कंपनीमधील विविध प्लाटची पाहणी केली. यावेळी केंद्रीय सचिव एस. अपर्णा, एचए मजदूर संघाचे अध्यक्ष खासदार मनोज कोठक, एचए कंपनी व्यवस्थापक नीरजा श्रॉफ आदी उपस्थित होते.
सध्या कंपनीने हँड सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले आहे. या विभागाचे उद्घाटन मांडविया यांच्या हस्ते करण्यात आले. मांडविया यांनी कंपनीचे भविष्यात काय नियोजन आहे, याची माहिती केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्याच्या सूचना दिल्या. कच्चा माल तयार करण्याबाबतचा प्रस्ताव द्या, त्याबाबत विचार करून निर्णय घेऊ, असे सांगितले.