- पालिका आयुक्तांकडून ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कामे मिळविताना बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी पालिका आयुक्तांनी यापूर्वीच १८ ठेकेदारांना ४ वर्षासाठी काळया यादीत टाकले आहे. तसेच ज्यांनी बनावट एफ.डी.आर सादर करून कामे मिळवले आहे, अश्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पुन्हा दोन ठेकेदारांनी बनावट कागदपत्रे सादर करून पालिकेचे काम मिळविल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
यातील एक ठेकेदार मेसर्स राजेश इंजिनिअर्सचे मालक रेवजी सहादू घाडगे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील कामासाठी सादर केलेल्या अनुभव दाखल्याबद्दल लेखी तक्रार प्राप्त झाली होती. दुसरा ठेकेदार मेसर्स संजीव प्रिसीजन यांचे मालक संजीव यशवंत चिटणीस यांनी निवेदेतील सादर केलेल्या अनुभव दाखल्याबद्दल तोंडी तक्रार करण्यात आली होती. प्राप्त तक्रारीवरून संबंधित कार्यालयाकडे कागदपत्रांची सत्यता पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये अनुभव दाखले बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
निविदा मिळविताना जी कामे १० टक्के पेक्षा जास्त कमी दराची असतात. त्या कामासाठी पालिका अनामत रक्कम, बँक गॅरन्टी किंवा एफडीआर भरून घेते. मात्र हे दस्ताऐवज नंतर बोगस व बनावट आढळले. अशा १८ ठेकेदारांना पालिकेने आधीच दणका दिलेला असताना, त्यात आणखी दोन ठेकेदारांची भर पडली आहे.