- आ. लांडगे यांच्या मध्यस्थीने तिढा सुटला..
- बंडातात्या पंढरपूरकडे रवाना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२१) :- आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. आषाढी वारीसाठीही सरकारच्या वतीनं नियमावली जारी करण्यात आली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसनं पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे.
मात्र, पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना आज शनिवारी पहाटे वडमुखवाडी येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
आज सकाळी बंडातात्या यांच्या समर्थक वारकऱ्यांनी पोलिसांची गाडी अडवली. तसेच, आम्ही पायी चालत पंढरपुरला जाणार, अशी भूमिका घेतली. पायी वारी साठी परवानगी द्यावी, अशी मागणी बंडातात्या यांनी केली होती. पायी वारी करू नये असे समजावून सांगण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी बंडातात्या आणि वारकऱ्यांमध्ये मध्यस्थीची भूमिका केली. दोन तास झालेल्या चर्चेनंतर अखेर बंडातात्या यांनी गाडीतून पंढरपूरला जाण्यास होकार दर्शवला. मात्र, माझ्यासोबत असलेल्या वारकऱ्यांना पायी पंढरपूरला जाण्याची परवानी द्यावी, अशी मागणी केली. पोलिसांसोबत बंडातात्या आता गाडीमधून पंढरपुरच्या दिशेने रवाना झाले आहेत.