- विवाहितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२१) :- लग्न झाल्यानंतर सासरी नांदत असताना आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेला स्वयंपाक नीट करता येत नाही. आईने लग्नामध्ये काही हौसमौज केली नाही. तसेच लहान-लहान कारणावरून विवाहितेला वाईट शिवीगाळ करून मारहाण केली. तिच्या पतीच्या ओळखीच्या एका महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध होते. त्या महिलेचे ऐकून आरोपी मारहाण करत असे. तसेच व्यवसायासाठी दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी आरोपी करत होते.
ती मागणी पूर्ण न झाल्याने तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १८ ऑक्टोबर २०२० ते १ एप्रिल २०२१ या कालावधीत आढेगाव व जाधवाडी, चिखली येथे घडली.
मृत विवाहितेच्या आईने शनिवारी (दि. १०) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती दिनेश आनंद रोकडे, सासरे आनंद रोकडे, दीर नितीन आनंद रोकडे आणि दोन महिला आरोपी (सर्व रा. आडेगाव पोस्ट अबोली ता. खेड जिल्हा पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.