- विनापरवाना वृक्ष व फांद्या तोडल्यास पन्नास हजारांचा दंड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात नविन बांधकाम चालु करण्यासाठी वृक्षसंवर्धन ना हरकत दाखला देणेपुर्वी प्लॉटमध्ये मानांकाप्रमाणे आवश्यक वृक्ष नसतील तर ८०.०० चौ.मी क्षेत्रासाठी १ वृक्ष या प्रमाणे प्रति वृक्ष रक्कम रुपये ४,०००/- (अक्षरी रक्कम रुपये चार हजार फक्त) स्विकारुन ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येत होते.
पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्य बैठकीमध्ये (दि. ६ जुलै) प्रति वृक्ष वृक्षसंवर्धन अनामत रक्कम रुपये ४,०००/- (अक्षरी रक्कम रुपये चार हजार) ऐवजी रक्कम रुपये १०,०००/- (अक्षरी रक्कम रुपये दहा हजार फक्त) प्रमाणे घेण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिलेली आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ मधील प्रकरण ८ मधील कलम २१(१) मधील तरतुदीचे उल्लंघन केल्यास कोणतीही व्यक्ती / संस्था कोणतेही झाड तोडण्यास कारणीभुत होईल अशा व्यक्ती / संस्थेकडुन प्रति वृक्ष र.रु ५,०००/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार) ऐवजी रक्कम रुपये ५०,०००/-(अक्षरी रक्कम रुपये पन्नास हजार फक्त) दंड घेणेस / वसुल करणेस मान्यता आहे. जेणेकरुन महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत वृक्षतोड करण्यास आळा बसेल, अशी माहिती पालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिली.
















