- सत्ताधाऱ्यांच्या मानगुटीवरील यांत्रिकीकरणाचे भूत अद्यापही कायम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील १८ मीटर व त्यापेक्षा मोठ्या रस्त्यांची साफसफाई यांत्रिकी पद्धतीने करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यासाठी विभाग निश्चित केले असून, एकत्रित रस्त्यांची अंदाजित लांबी ९२८ किलोमीटर गृहित धरण्यात आली आहे. सात वर्षे कालावधीसाठी अंदाजे ४६४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
मार्च महिन्यात दप्तरी दाखल केलेला वादग्रस्त विषय पुन्हा पुनरुज्जीवित केला आहे. आमदार, सर्वपक्षीय नगरसेवकांसह दिग्गज नेत्यांचा या निविदेत रस असल्यामुळे साफसफाई निविदेचा खेळखंडोबा सुरू आहे. शहरातील रस्ते साफसफाईसाठी २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१७ या दोन वर्षे कालावधीसाठी ठेकेदारांना काम दिले होते. हा कालावधी संपुष्टात आल्यानंतर या संस्थांना पुन्हा मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपुष्टात आली. मुदत संपल्यामुळे शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाईसाठी पॅकेजनिहाय दर मागविले होते. तांत्रिक त्रुटी राहिल्याचे निदर्शनास आल्याने ६ जुलै २०२० रोजी ही निविदा रद्द केली होती.
शहरातील रस्त्यांचे यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे. त्यासाठी विविध पर्यावरणीय कायदे, घनकचरा व्यवस्थापन कायदे, स्वच्छ भारत अभियान, माझी वसुधरा यांचा आधार घेतला आहे. स्थायीने ११ सप्टेंबर २०१८ रोजी मंडई , रस्ते आणि इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पद्धतीने साफसफाईच्या कामासाठी आरएफपी तयार करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली होती. मसुदा ७ जानेवारी २०२१ रोजी सादर केला. या अनुषंगाने १९ जानेवारीला सादरीकरण केले. त्यात दुरुस्तीच्या सूचना आल्या. त्यानुसार पालिकेने सुधारित मसुदा सादर केला आहे.