- तलवार व दांडक्याने दुचाकीचे नुकसान; चिंचवडमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- चिंचवडच्या रामनगर येथील सार्वजनिक शौचालयाजवळ लघुशंका करीत असताना आरोपी तिथे आले. लाकडी दांडक्याने तरुणाच्या पाठीत, कानावर, हातावर, पायावर मारून त्यांना जखमी केले.
त्यावेळी फिर्यादीचे नातेवाईक भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीला शिवीगाळ केली. तलवार आणि लाकडी दांडक्याने फिर्यादी यांचे नातेवाईक यांच्या दुचाकीची (एम एच १४ / एच एच ५५७७) तोडफोड केली. त्यानंतर आरडाओरडा करत जमलेल्या लोकांना धमकावले. ‘घराबाहेर आल्यास जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (दि. ११) रात्री घडली.
राहुल युवराज शेलार (वय २९, रा. दत्तनगर, शेलार गल्ली चिंचवड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वन विष्णू लष्करे (वय २४, रा. रामनगर, चिंचवड), आकाश कुसाळकर (वय २९, रा. दत्तनगर चिंचवड), बालाजी युवराज कोकाटे (वय ३०, रा. दत्तनगर चिंचवड), अण्णा कुसाळकर (वय ३०, रा. रामनगर चिंचवड) आणि त्यांचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आकाश कुसाळकर आणि बालाजी कोकाटे या दोघांना अटक केली आहे.पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.












