- ६.४ कि.मी. लांबीच्या पाईपचे इनलायनिंग व गनायटींगचे काम पूर्ण..
- आ. लांडगेंची उपस्थिती; तातडीने काम सुरु करण्याच्या सुचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- भामा आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे नियोजन महापालिकेने केले असून, वेळेत हे पाणी शहवासीयांना उपलब्ध व्हावे यासाठी नुकतीच सर्व संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, सह शहर अभियंता प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंदारे, विद्युत विभाग कार्यकरी अभियंता संदेश चव्हाण, उपअभियंता मांढरे साहेब, पाणी पुरवठा उपअभियंता चंद्रकांत मुठाळ आदी उपस्थित होते.
शहराला पवना धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. समाविष्ठ गावांतील पाणीपुरवठा आजही विस्कळीत आहे. बैठकीमध्ये प्रकल्पानिहाय सद्यस्थिती व कामात असलेल्या अडी-अडचणींबाबत चर्चा झाली. भामा आसखेड धरण ते नवलाख उंब्रे ब्रेक प्रेशर टँक पर्यंत ८.८ कि.मी. लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
तसेच, नवलाख उंब्रे ब्रेक प्रेशर टैंक ते देहूपर्यंत १८.९ कि.मी. लांबीची जलवाहिनी टाकणेत येणार आहे. अशी एकूण २७.७० कि.मी. लांबीच्या जलवाहिनीकरिता लागणा-या एकूण पाईप पैकी ७.६ कि.मी. लांबीचे पाईप साईटवर पुरविण्यात आलेले आहेत. त्यापैकी ६.४ कि.मी. लांबीच्या पाईपचे इनलायनिंग व गनायटींग करणेचे काम पूर्ण झाले आहे. जलवाहिनीच्या एकूण लांबीपैकी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अखत्यारितील ज्या रस्त्यांच्या कडेने जलवाहिनी टाकणेची परवानगी पालिकेस मिळालेली आहे. त्या ठिकाणी जलवाहिनी टाकणेचे काम करणेत येईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तळवडे येथील अशुध्द जलउपसा केंद्र व चिखली येथील जलशुध्दीकरण केंद्राचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. देहूपासून भंडारा डोंगरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता खोदाईस परवानगी दिली असुन त्या ठिकाणी तातडीने काम सुरु करण्याच्या सुचना अधिका-यांना दिल्या.
– आ . महेश लांडगे, (शहराध्यक्ष भाजप तथा आमदार, भोसरी विधानसभा मतदार संघ)…