- उपमहापौरांकडून पदोन्नतीची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रवीण लडकत यांच्यावर अन्याय करत त्यांची पदावनती (डिमोशन) करण्यात आली. शहराच्या पर्यावरण क्षेत्रात पारदर्शीपणे काम करणारा निस्वार्थ अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
पाणीपुरवठा विभागातील त्यांचे कार्य चांगले आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीच्या निर्णयात लडकत यांच्या कार्याचा आणि निस्वार्थ सेवेचा सन्मान करण्याऐवजी प्रशासनाने त्यांना खालच्या पदावर काम करण्याचे आदेश देत अवमानच केला आहे. दुसरीकडे लडकत हे फेब्रुवारी २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत.
शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी नवीन स्त्रोत निर्माण होणे अपेक्षीत आहे. अशा परिस्थितीत अनुभवी अधिकाऱ्याच्या अनुभवाचा फायदा प्रशासनाने करुन घेतला पाहिजे. मात्र, प्रशासन लडकत यांना पदावनती (डिमोशन) करुन अन्याय करीत आहे. याचा परिणाम, शहरातील प्रकल्पांवर होणार आहे. त्यामुळे एकप्रकारे पिंपरी-चिंचवडकरांना त्याचा फटकाच बसणार आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करुन प्रशासनाने लडकत यांना सन्मानाने पदोन्नती द्यावी, अशी मागणी उपमहापौर हिराबाई घुले यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.












