- निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२१) :- फिर्यादी हे आकुर्डी येथील सुखवानी प्लाझा बिल्डिंग समोरील रस्त्याने जात होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीच्या आरोपीने त्यांना आवाज दिला आणि पैशांची मागणी केली. मात्र फिर्यादी यांच्याकडे पैसे नसल्याने फिर्यादी यांनी आरोपी याला पैसे देण्यास नकार दिला.
या कारणावरून आरोपीने शेजारीच असलेल्या चिकनच्या दुकानामधून चिकन तोडायचा लोखंडी सत्तूर आणला. त्याने फिर्यादी यांच्या डाव्या खांद्यावर २२ तर डाव्या हातावर १० असे एकूण ३२ वार केले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. १७) सुखवानी प्लाझा बिल्डिंग समोर आकुर्डी येथे सकाळी घडली.
नबीन दानबहादुर कुंअर (वय २६, रा. भेळ चौक, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय पुरुषोत्तम जाधव (वय २६, रा. आकुर्डी गावठाण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.