- शहरातील घटना; जातपंचायतीच्या अध्यक्षासह इतरांवर गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२१) :- पत्नीला नांदायला पाठवायचे की नाही याबाबत अचानक जात पंचायत बोलवली. जात पंचायतीने १५ लाखांचा दंड ठोठावला. दंड न भरल्याने जातीतून बहिष्कृत करण्याची शिक्षा दिली. मोशी येथे १ फेब्रुवारी २०२१ रोजी ही घटना घडली.
प्रशांत ऊर्फ विकी गागडे, संगीता गागडे, शुभम गागडे, महिला आरोपी (तिघेही रा. आदर्शनगर, मोशी) छोटू गागडे (रा. भाटनगर, पिंपरी), जातपंचायतीचे अध्यक्ष विजय गागडे (रा. येरवडा, पुणे), पंच गुल्या अबंगे, सूर्यकांत माचरे, शशिकांत गागडे, बबलू तामचीकर, सुभाष माचरे व इतर लोक अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सुशांत सुनील नगरकर (वय २६, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि.१७) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध व निवारण) कायदा २०१६ अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पत्नीला नांदायला पाठवायचे किंवा नाही यासंबंधी घरगुती चर्चा करण्यासाठी फिर्यादीला बोलविले. मात्र फिर्यादीला काही एक न सांगता जात पंचायत भरवली. फिर्यादीला जातपंचायतीने १५ लाखांचा दंड केला. दंड न भरल्यास कंजारभाट या जातीतून बहिष्कृत करण्याची शिक्षा दिली. फिर्यादीने दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांना कंजारभाट समाजातून बहिष्कृत केले.