न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जाने.) :- संभाजीनगर येथील एमआयडीसी ‘जी ब्लॉक’ परिसरातील एचडीएफसी कॉलनीसमोर महापालिकेचा भूखंड आहे. बस टर्मिनलसाठी हा भूखंड आरक्षित आहे. हा भूखंड बळकाविण्यासाठी भाजप नगरसेवक तुषार हिंगे फूड फेस्टिव्हल आणि आठवडे बाजार भरवित आहेत. त्यासाठी हिंगे आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुपेकर यांनी संगनमताने भूंखडाची सीमाभिंत तोडून जागेचे सपाटीकरण केले आहे.
भाजप नगरसेवक हिंगे आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुपेकर यांनी विनापरवाना संरक्षण भिंत तोडून भुखंड बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दोघांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माजी महापौर मंगला कदम यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
दरम्यान नगरसेवक तुषार हिंगे या आरोपास उत्तर देताना आमच्या प्रतिनिधीस म्हणाले की, ”वाढदिवसानिमित्त या ठिकाणी फूड फेस्टिव्हल व आठवडे बाजार भरविण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाकडून रीतसर परवानगी घेतलेली आहे. या परिसरात असलेल्या सीमाभिंती बाबत मला कोणतीही माहिती नाही. कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत”.















