- जीवनावश्यक व मेडिकल वस्तूंच्या कीटसह चिपळूणच्या दिशेने होणार रवाना..
- आमदार महेशदादांकडूनही पांडाभाऊंच्या दातृवाची दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२१) :- कोकण किनारपट्टीवर उसळलेल्या जलप्रलयात मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. यानंतर विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरु आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने यांनी अशा संकटसमयी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. या अडचणीच्या परिस्थितीत प्रभाग क्रमांक १ चिखली मोरेवस्तीतील कोकण परिसरातील रहिवाशांच्या मागणीनुसार पांडाभाऊ साने यांनी तातडीने मदतकार्यासाठी पथक उभारले आहे.
त्यांनी स्व-खर्चातून व प्रभागातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून जीवनावश्यक वस्तू, मेडिकल व इतर उपयोगी वस्तूंचे कीट तयार केले. हे मदतकार्य घेऊन ते स्वतः आज मंगळवारी (दि. २७) रोजी सायंकाळी चिपळूण पासुरेच्या दिशेने रवाना होणार आहे. या सामाजिक दातृत्वाची भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे यांनी दखल घेत, साने यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. तेथील मदतकार्याची पाहणीही केली. त्यांच्या दातुत्वाच्या कामगिरीने भारावले व त्यांची पाठही थोपटली.
या उपक्रमाबाबत माहिती देताना पांडाभाऊ म्हणाले, चिपळूणसह कोकणात बहुतांश ठिकाणी निसर्गाने रुद्रावतार घेत, हाहाकार माजविला आहे. यात अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे तर, अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांना धीराची व मदतीची आवश्यकता आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या आवाहनाला व आमच्या प्रभागातील कोकणवासीयांच्या आर्त हाकेला साद देत, मदतकार्य सुरु केले आहे. त्यानुसार दैनंदिन वस्तूंचे कीट तयार केले आहे. त्यात गव्हाच्या पिठापासून लहान मुलांचे कपडे, पाणी बॉटल, दुध पावडर, उपवासाचे पदार्थ अशा जीवनावश्यक तर, ताप-सर्दी-खोकला-डोकेदुखी- महिलांसाठी सॅनिटरी पॅड अशा मेडिकल किटचा समावेश आहे. जेणेकरून १५ दिवस या वस्तूंवर त्यांची गुजराण होईल. इतका वस्तूंचा साठा त्यांच्यापर्यंत मी स्वतः जाऊन पोहोच करणार आहे. माझ्यासह काही स्वयंसेवकांचे एक मदतकार्य पथक आवश्यक साधनसामुग्रीसह चिपळूणच्या दिशेने आज सायंकाळी रवाना होत आहे. तेथे पोहचून लगेच मदतकार्याला सुरुवात केली जाणार आहे.