- दिवंगत दत्ता फुगेच्या मुलासह एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२१) :- ‘आमच्या भाईला का मारले’, असे म्हणत तरुणावर कोयत्याने वार केले. यातच तरुणाचा मृत्यू झाला. भोसरीतील लांडगे आळी येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ सोमवारी (दि. २६) सकाळी ही घटना घडली होती. अमन सुरेश डांगळे (वय २७, रा. देवकरवस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
भोसरी पोलिसांनी घटनेच्या तपासासाठी दोन पथके तयार केली होती. पोलिसांनी अवघ्या काही तासातच तरुणाच्या खुनाचा शोध लावला असून, दिवंगत गोल्डमेन दत्ता फुगे याचा मुलगा सराईत गुन्हेगार शुभम फुगे हा पलायन करण्याच्या बेतात होता. त्याच्यासह आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत तर एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली अमन डांगळे (वय २५) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी शुभम दत्ता फुगे (वय २६, रा. भोसरी), प्रथमेश वायकर (वय १९), यांना अटक केली आहे. त्यांच्यासह एक विधीसंघर्षीत बालकावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शुभम याच्या विरोधात यापूर्वी तीन तर विधीसंघर्षीत बालकाच्या विरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.
आरोपी आणि मयत तरूण हे शुभम फुगे याच्या घराच्या टेरेसवर एकत्र दारू पिण्यासाठी बसलेले असताना त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी मयत तरुणाने शुभम फुगे याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा बदला घेण्यासाठी आरोपींनी तरुणाच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करीत त्याचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
















