- दिघीत निलंबित पोलिसाला दगडाने मारहाण; वाहनाचेही मोठे नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२१) :- रस्त्याच्या मध्यभागी थांबून आरोपींचे टोळके आरडाओरडा करत होते. फिर्यादी यांनी त्यांना समजावून सांगितले व तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी हे दिघी जकात नाका जवळ गेले त्यावेळी पाठीमागून आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांची गाडी अडवली. त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली.
आरोपीला फिर्यादी यांनी दिघी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना यापूर्वी मारहाणीच्या गुन्ह्यात पकडले होते. त्याचा राग ठेवून फिर्यादी यांना दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर आरोपी जोरजोराने शिवीगाळ करत दहशत माजवत निघून गेले.
फिर्यादी हे चंदननगर पोलिस ठाणे येथे कार्यरत असून एका प्रकरणांमध्ये ते निलंबित झाले आहेत. मंगळवारी (दि. २७) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास मित्राच्या बहिणीचा साखरपुडा ठरवण्यासाठी ममता चौक दिघी येथून चालले होते. त्यावेळी ही घटना घडली. परमेश्वर तुकाराम सोनके (वय ४१ रा. पोलीस कॉलनी, दिघी) यांनी मंगळवारी (दि. २७) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिकेत हेमराज वाणी (वय २१, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी), सुरज खिल्लारे, अनिल चव्हाण, भगत उर्फ धर्मेश सिंग, गणेश साबळे, राहुल जाधव व इतर दोन अनोळखी साथीदार या नऊ जणांच्या विरोधात खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक भीमसेन शिखरे याबाबत अधिक तपास करीत आहेत.