- लिंक रोड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील सदनिकांची महापौरांच्या हस्ते सोडत…
- स्वतःच्या जीवनशैलीत बदल करा; नव्या विचारांनी आयुष्य समृध्द करा – नगरसेवक शैलेश मोरे..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२१) :- झोपडपट्टीवासीयांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. या घराचा वापर योग्य प्रकारे करून आपले राहणीमान उंचवावे. तसेच दिलेली सदनिका स्वच्छ व सुंदर ठेऊन नागरिकांनी विकू नये, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड लिंकरोड येथील झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसन प्रकल्पातील सदनिकांची संगणकीय सोडत आज चिंचवड येथे झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागात त्यांच्या हस्ते घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी नगरसेवक शैलेश मोरे, नगरसेविका जयश्री गावडे, नगरसेवक शितल शिंदे, माजी नगरसेवक जगन्नाथ साबळे, सहा.आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, सामाजिक कार्यकर्ते दिपक मेवानी, प्रताप खैरारीया, सुंदर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी स्व:हिस्सा भरावा व सदनिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.
स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे म्हणाले, आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेने झोपडपट्ट्यांच्या वाढीला पायबंद बसावा म्हणून नागरिकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेद्वारे हक्काचा निवारा मिळवून दिला आहे. सर्वसामान्य गरीब माणसाचे घराचे स्वप्न साकार केले आहे. झोपडपट्टीत वास्तव्य असणा-या गरीब झोपडीधारक कुटुंबास सुसज्ज सदनिका मिळवून दिली आहे. त्या माध्यमातून स्वतःच्या जीवनशैलीत बदल करा. नव्या विचारांनी आपले आयुष्य समृध्द करा. त्यासाठी आपला नगरसेवक व महापालिका आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे आश्वासन नगरसेवक मोरे यांनी यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना केले. नगरसदस्य जयश्री गावडे नगरसदस्य शितल शिंदे, माजी नगरसदस्य जगन्नाथ साबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या प्रकल्पात ५ इमारती उभारण्यात आलेल्या आहे. त्यापैकी २ इमारतीसाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांची संगणकीय सोडत आज रोजी काढण्यात आली. १ इमारतीमध्ये ११२ सदनिका असून एका सदनिकेचे क्षेत्रफळ २६९ चौ. फुट इतके आहे. त्यापैकी १ सदनिका अंगणवाडीकरिता राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच दिव्यांगासाठी शासकीय नियमानुसार आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. यासाठी लाभार्थ्याकडून स्व:हिस्सा रु.४२,५७०/- मागासवर्गीयांसाठी व रु.५०,५७५/- खुला वर्गासाठी असून ज्यांची नावे पात्र लाभार्थ्यांमध्ये आहेत त्यांच्याकडून हा स्व:हिस्सा भरून घेऊन त्यांना सदनिकेचे वाटप करण्यात आले आहे.
आभार नगरसदस्य शैलेश मोरे यांनी मानले.