- शहीद वीर जवानांच्या व पोलीस बांधवांच्या वीर पत्नींचा होणार सन्मान..
- महिलांसाठी ‘बेक द केक’ या स्पर्धेचेही आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२१) :- मोशीतील कर्तव्यम सोशल फाउंडेशन आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानांच्या पत्नींचा, कोरोना महामारीच्या काळात सेवा करत असताना शहीद झालेल्या पोलीस बांधवांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी ‘बेक द केक’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
केक बनविण्यासाठी स्वच्छ भारत अभियान, कारगिल विजय, बेटी बचाव बेटी पढाओ, सर्जिकल स्ट्राइक, स्मार्ट सिटी, उज्वला गॅस, नमामि गंगे, मेक इन इंडिया हे राष्ट्रीय स्तरावरचे तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या व्हिजन 2020 या महत्वाकांक्षी उपक्रमातील डियर सफारी पार्क, छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा, ललित कला अकादमी, नमामि इंद्रायणी असे विषय देण्यात आले आहेत. या थीमवर महिलांनी केक बनवायचे आहेत.
संतोष बारणे माहिती देताना म्हणाले, मोशी येथे १७ ऑगस्ट २१ रोजी हा सन्मान सोहळा होणार आहे. भारतीय सैन्याचे बिग्रेडियर आर. सी. कटोच, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश उपस्थित राहणार आहेत. १६, १७ ऑगस्ट रोजी महिलांसाठी थीम केक बेकिंग ‘बेक द केक’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १० ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करावी. प्रथम येणा-याला १० हजार रुपये, द्वितीय ७ हजार आणि तृतीय येणा-याला ५ हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.















