- स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन सेंटरचे आमदारांच्या हस्ते उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड ही श्रमिकांची नगरी आहे व पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. श्रमिकाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देवून रोजगारभिमुख करण्यासाठी स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वोतोपरी सहकार्य या उपक्रमाला करेल असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.
कोरोना महामारीमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक बदल झाले आहेत. त्याच बरोबर पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल होत आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक उद्योगधंद्यांवर परिणाम झाला असून त्यामुळे नोकऱ्यांचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. परंतु त्याच वेळी नवीन संधीदेखील उपलब्ध होत आहेत. या बदलत्या काळामध्ये तरुणांना वर्तमान आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन सेंटर(एसटीआयसी)ची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नितीन करमाळकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे, इनोव्हेशन, इन्क्यूबेशन आणि लिंकेजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, प्र.कुलगुरू एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, अशोक भालकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, बुद्धिमत्ता आणि श्रम एकत्र आले तर प्रगती करता येते. विविध भाषांचे प्रशिक्षण घेवून विद्यार्थ्यांनी परदेशी जावे. शिक्षण थांबले तर एक संपूर्ण पिढीची प्रगती थांबते, शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून महानगरपालिकेचे एखादे विकास काम थांबले तरी चालेल पण शिक्षणासंबंधी काम थांबू देणार नाही. ज्याला बुद्धिमत्ता आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी व श्रमिकाला विद्येची जोड देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचेही यावेळी आमदार जगताप म्हणाले.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, आपण २१ व्या शतकात जगत असून शिक्षण आणि कला प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची आहे. काही मुलांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नाही त्यांना या उपक्रमातून तांत्रिक शिक्षण दिले जात असल्याने त्यांना भविष्यात स्वावलंबी होण्यात मदत होईल. तसेच प्रत्येक नागरिक विविध कौशल्य प्राप्त करतील व आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, या स्मार्ट आणि इनोव्हेटिव्ह कोर्सेसच्या माध्यमातून उद्योगांना लागणारे आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. या उपक्रमातून ३ ते ५ हजार युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या उपक्रमास पुढे नेण्यास कटिबद्ध आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत यासाठी संपूर्ण देशामध्ये एकमेव ठरेल असा हा उपक्रम महापालिका आणि राज्यातील अग्रगण्य विद्यापीठ यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. या माध्यमातून भविष्यातील औद्योगिक क्रांतीसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रोजगारनिर्मितीच्या संदर्भात हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे. युवकांना उद्योगांना आवश्यक ठरेल असे प्रशिक्षण मिळाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारसंधी उपलब्ध होतील. शहराच्या आसपास असणाऱ्या उद्योगधंद्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे उद्योगांवर आधारित असलेल्या महापालिकेच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळेल.
या उपक्रमा अंतर्गत सुरुवातीला एकूण ४ प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट- अझ्यूर क्लाउड अॅडमिनिस्ट्रेशन, रेडहॅट-लिनक्स अॅडमिनिस्ट्रेशन, सॅप एबीएपी अँड एमएम फॉर अकाऊंट्स, फायनान्स अँड बॅक ऑफिस अँड ऑटोकॅड इन डिजाईन फ्रॉम ऑटोडेस्क यांचा समावेश आहे. सुरुवातीला रेकॉर्डिंग आणि लाइव्ह सेशनच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल. पुढे कालांतराने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या अन्यत्र उपलब्ध असणाऱ्या प्रशिक्षण शुल्काच्या तुलनेत या प्रशिक्षणाचे शुल्क अत्यंत माफक ठेवण्यात आले आहे.
एसटीआयसी उपक्रमाची काही वैशिष्ट्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगारसंधी वाढतील, अत्याधुनिक प्रशिक्षणा मुळे त्यांच्यासाठी जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होतील. औद्योगिक क्षेत्रामध्ये नेतृत्व करणाऱ्या मान्यवरांकडून रोजगारक्षम मनुष्यबळ उपलब्ध करण्या साठी तयार करण्यात आलेला प्रशिक्षण कार्यक्रम आणि तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण घेण्याची संधी अशी या प्रशिक्षण कार्यक्रमाची वैशिष्ट्ये आहेत. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे हे तांत्रिक प्रशिक्षण असून अनेक प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञानाशी संबंधित नाहीत. या प्रशिक्षणामुळे तंत्रज्ञानाशी संबंधित नसलेल्या युवकांनादेखील तांत्रिक क्षेत्रातील रोजगारसंधी उपलब्ध होतील.
आज युवकांकडे असलेली व्यवसाय कौशल्ये भविष्यात पुरेशी ठरतीलच असे नाही या वस्तुस्थितीच्या आधारावर सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची संकल्पना विक सित करण्यात आली आहे. नव्याने आत्मसात केलेली कौशल्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. त्यामुळे युवकांनी रोजगारक्षम राहण्यासाठी त्यांच्या कामाशी संबंधित नवनवीन कौशल्ये सतत शिकत राहणे आवश्यक आहे.