- पोलिसांकडून चोरट्यांसह बँकेचे अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२१) :- अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. साईनाथनगर, निगडी येथे शिवकृपा कॉलनी शेजारील रोडवर असलेल्या अॅक्सिस बँकेचे एटीएममध्ये शनिवारी (दि. ७) पहाटे सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस कर्मचारी उद्धव खेडकर यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरटे, अॅक्सिस बँकेचे संबंधित अधिकारी आणि एटीएम सुरक्षेची व्यवस्था पाहणारी हिताची कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथनगर निगडीमध्ये शिवकृपा कॉलनी शेजारील रस्त्यावर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. शनिवारी पहाटे सव्वातीन ते साडेतीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनचा कॉस्मेटिक दरवाजा उघडला. आतील बाजूला असलेला मेन दरवाजा उचकटण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र मुख्य दरवाजा उघडता न आल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.
एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, अलार्म लावणे यासारख्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे बंधनकारक आहे. मात्र, या सर्व उपाययोजना अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये नसल्याने हा चोरीचा प्रयत्न झाला. त्यामुळे चोरट्यांसह बँकेच्या आणि एटीएमची सुरक्षा व्यवस्था घेतलेल्या हिताची कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल केला. एटीएम फोडून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी बँक, एटीएम मशीनच्या देखभाल दुरस्तीची तसेच सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एजन्सी कंपनीला पत्र पाठविले आहे.
















