- ४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२१) :- पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित ईडीच्या रडारवर आहेत. मनी लाँड्रिंगप्रकरणी दोघांना ईडीने यापूर्वी समन्स पाठवला होता. आता ईडीने अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जागा जप्त केली आहे.
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची तब्बल ४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पुण्यातील सरकारी जागेवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं होतं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही जमीन पुण्यातील गणेशखिंड रोडवरील रेंज हिल कॉर्नरमधील प्लॉन नंबर २, यशवंत घाडगे नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेत स्थित आहे.
भोसले यांची पुण्यातील कोरेगाव पार्क भागात हॉटेल वेस्टीन, गोव्यात हॉटेल डब्ल्यू रिट्रिट अँड स्पा, नागपूरमध्ये हॉटेल ल मेरेडियन ही तारांकित हॉटेल्स आहेत. दुबईतील रोशडेल असोसिएट्स लिमिटेड या कंपनीत भोसले कुटुंबीयांची गुंतवणूक आहे. परदेशातील बँकांमध्ये खाती आहेत. परकीय चलन व्यवहारात नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, ईडीने भोसले यांच्या गणेशखिंड रस्त्यावरील कार्यालयातही काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती.
















