- परिसरात खळबळ; बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील क्रोमा शोरूम लगत कोहिनुर टॉवर सोसायटी परिसरात मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण हटवित असताना बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी बॉम्बशोधक व नाशक पथक आणि वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते.
आज (सोमवारी) सकाळी ९ च्या सुमारास कारवाई सुरू असताना सोसायटीतील नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी व्हिडीओ कॉलवरून याची माहिती परिचितांना दिली. ही वास्तू ब्रिटिशकालीन बॉम्ब असून त्याच्या जवळ न जाण्याचा सल्लाही त्यांना परिचितांना दिला.
दरम्यान तेथील कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने बादलीमध्ये वाळूची पोती टाकून त्यात बॉम्ब सदृश वस्तू ठेऊन पुढील तपासणीसाठी नेण्यात आली आहे. सध्या या बॉम्ब सदृश वस्तूची तपासणी केली जात आहे. यापूर्वीही खोदकामा दरम्यान अशा ऐतिहासिक वस्तू आढळून आल्या आहेत.
















