- सोळाशे कंत्राटी साफ-सफाई कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड..
- रस्त्याची स्क्वेअर फुट प्रणाली वादग्रस्त; आयुक्तांचे दुर्लक्ष – बाबा कांबळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२१) :- पालिकेकडून रस्ते सफाईमधील भ्रष्टाचार उघड झाल्यामुळे मजूर संख्याऐवजी रस्त्याच्या स्क्वेअर फुटप्रमाणे नवीन निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे तब्बल सोळाशे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. तसेच भ्रष्टाचारालाही मोठी चालना मिळणार आहे. यात ठेकेदार व प्रशासन यांची मिलीभगत आहे, असा आरोप, कष्टकरी कामगार पंचायतिचे अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केला आहे.
कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते-सफाई, झाडलोट करणाऱ्या महिला-पुरुषांची विभागवार संवाद सभा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून भोसरीत महिलांची संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कष्टकरी जनता आघाडी उपाध्यक्षा मधुरा डांगे, योगिता गाडेकर, नीलम खांदवे, आशा सोनावणे, सुषमा स्वामी, सुवर्णा सिरसाट व आदी महिला उपस्थित होत्या.
बाबा कांबळे म्हणाले, महापालिकेत रस्ते साफसफाईसाठी सोळाशे महिला-पुरुष कंत्राटी पद्धतीने कामे करत आहेत. एखाद्या ठिकाणी कायम कामे असतील तर त्या ठिकाणी ठेकेदार पद्धत बंद करून कंत्राटी कामगारांना कायम केले पाहिजे, असा कामगार कायद्यात नियम आहे. रस्ते साफसफाई, घनकचरा प्रक्रियांमध्ये करोडोंचा मलिदा खाण्यासाठी पालिकेचे अधिकारी ठेकेदारांशी संगणमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत. त्यामुळे गेल्या वीस वर्षापासून चतुर्थी श्रेणी कामगारांची भरती बंद आहे. रस्ते सफाईसाठी निविदा जाहीर केल्या असून संख्यबळाऐवजी स्क्वेअर मीटरप्रमाणे रस्ते साफसफाईची निविदा राबविली जात आहे. यात संख्याबळाची अट नसल्यामुळे ठेकेदाराचे फावणार असून, अनेकांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे. अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीय दलित-बहुजन समाजातील कष्टकरी सफाई कामगार महिलांवर अन्याय होत आहे. आयुक्त राजेश पाटील याची दखल घेत नाहीत. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ तिव्र आंदोलन पुकारून आयुक्तांना जाब विचारणार असल्याचे बाबा कांबळे हे भोसरीतील संवाद सभेत म्हणाले.+
















