- शहरातील सर्व होर्डिंग्जचे ७ दिवसांत सर्वेक्षण मग कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात अनधिकृत होर्डिंग्जचे पेव फुटले आहे. नव्याने रस्ता विकसित झाला की, तेथे अनधिकृतपणे होर्डिंग्ज लावून जाहिरातबाजी केली जाते. शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकामार्फत एकाच वेळी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे शहर अनधिकृत होर्डिंग्जमुक्त होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
इंदूर शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहर जाहिरात होर्डिंग्जमुक्त करण्याचा संकल्प आयुक्त राजेश पाटील यांनी केला आहे. त्या दृष्टीने त्यांनी नियोजन केले आहे. शहरात सुमारे २ हजार होर्डिंग्ज आहेत. त्यापैकी केवळ ५०० होर्डिंग्ज अधिकृत आहेत. उर्वरित होर्डिंग्ज हे अनधिकृत परवाना नूतनीकरण तसेच शुल्क न भरलेले आहेत. क्षेत्रीय अधिकारी आणि आकाशचिन्ह परवाना विभागाचे निरीक्षक यांचे स्वतंत्र पथक स्थापन करून शहरातील सर्व होर्डिंग्जचे ७ दिवसांत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी एक स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. त्यावर नोंदी करून होर्डिंग्जचे आकारमान, अधिकृत की अनधिकृत आदी नोंदी केल्या जाणार आहेत. त्यानंतर अनधिकृत होर्डिंग्जवर पोलिस बंदोबस्तात कारवाई केली जाईल.
सर्वच क्षेत्रीय समितीच्या पथकांकडून एकाचवेळी कारवाई केली जाणार आहे. त्यापूर्वी कोणत्या भागात कारवाई केली जाणार आहे. ते पालिका प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळे संबंधितांना होर्डिंग्ज काढून घेण्यास वेळ मिळणार आहे.
















