- पिंपरीतील साईनगर अपार्टमेंटमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२१) :- पिंपरीतील साईनगर अपार्टमेंटमधील लिफ्टमध्ये वृत्त्तपत्र वितरक असलेला अल्पवयीन मुलगा अडकला होता. त्या मुलाची सोसायटीची भिंत फोडून सुखरूप सुटका करण्यात आलीय. सुमित आळसे असं वृत्त्तपत्र वितरक मुलाचे नाव आहे.
तो साईनगरमध्ये (शुक्रवारी) सकाळी वर्तमानपत्र टाकत जात होता. दोन इमारतीमध्ये वर्तमानपत्र टाकल्यानंतर तिसऱ्या इमारतीच्या लिफ्टमध्ये जाऊन तो ७ व्या मजल्यावर पोहोचला. परंतु, लिफ्टमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे ७ व्या मजल्यावर ती लिफ्ट न थांबता तशीच टेरेसवर जाऊन अडकली. अचानक लिफ्ट बंद झाल्याने तो घाबरला. नंतर त्याने अलार्म बटन दाबले आणि वर्तमानपत्र विक्रेते हेमंत तांबे यांना फोन केला. तांबे यांनी तात्काळ सोसायटीचे चेअरमन निलेश गिते यांना फोन केला.
गिते यांनी सुरक्षारक्षक आणि लिफ्टच्या देखभाल करणाऱ्या कंपनीला फोन केला आणि अभियंत्याला बोलवले. त्यानंतर सुमितला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र, बाहेर काढता येईना. अखेर ब्रेकरने भिंत फोडून सुमितला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तात्काळ भिंत फोडून सुमितला बाहेर काढण्यात आले. सर्वांच्या प्रयत्नातून मला जीवदान मिळाल्याची भावना त्याने व्यक्त केली.