- कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने नागरिक व व्यवसायिकांमध्ये उत्साह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२१) :- भाऊ – बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा सण म्हणजे रक्षांबधन. येत्या रविवारी (दि. २२) साजरा होत असून, विविध प्रकारच्या राख्यांनी बाजारपेठ सजली आहे. राखी व गिफ्ट खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये महिलांची मोठी गर्दी आहे. यावर्षी बाजारात विविध प्रकारच्या राख्या आल्या असून, बच्चे कंपनीसाठीही वेगळ्या प्रकारच्या राख्या बाजारात आल्या आहेत.
गेल्या १५ दिवसांपासून रक्षाबंधनासाठी बाजारात राख्या उपलब्ध झाल्या आहेत. रक्षाबंधन चार- पाच दिवसांवर आल्यामुळे आता बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, प्राधिकरण, भोसरी परिसरात अनेक छोट्या – मोठ्या व्यावसायिकांनी राख्यांची दुकाने थाटली आहेत. या राख्यांच्या विक्रीतून लाखोंची उलाढाल होते. लेडीज राखी व जोड राखी हे प्रकारही महिला खरेदी करताना दिसत आहेत, असे व्यावसायिक सांगतात.
असे आहेत राखीचे प्रकार…
कुंदन, खडे, कार्टून, लाईट यांसह धाग्याच्या राखी तसेच स्पंजच्या राखी उपलब्ध आहेत. किमान १ रुपयापासून ते १०० रुपयांहून अधिक एका राखीचा दर आहे. यामध्ये लहान मुलांना आकर्षित करणारी कार्टूनची राखी ८० रुपये आणि लाईटच्या राखी ३० रुपये ते १५० रुपयांपर्यंत विक्री होत आहेत.
















