- दोन्ही ज्येष्ठ नागरिकांवर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२१) :- निवृत्त झालेल्या वडिलांना मुलाने महिनाभरापूर्वी स्मार्ट फोन घेऊन दिला. त्या मोबाइलवरून त्यांनी एका राजकीय पक्षाच्या ग्रुपवर धार्मिक भावना भडकविणारी पोस्ट टाकली. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दोन जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. ही घटना निगडी येथे घडली.
यमुनानगर, निगडी येथे एका राजकीय पक्षाचा हॉटस्अॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर एका नागरिकाने धार्मिक भावना भडकविणारी पोस्ट टाकली. याबाबतची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. निगडी पोलीस त्या नागरिकाच्या घरी गेले. ज्यांच्याकडे तो मोबाइल नंबर होता त्या ७५ वर्षीय नागरिकाला पोलीस ठाण्यात आणले. त्यांना ही पोस्ट जवळच राहणाऱ्या दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाने पाठविली होती. त्यांनाही पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर दोन्ही ज्येष्ठ नागरिकांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले.
निवृत्त झालेल्या त्या ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला घरी बसून वेळ जात नव्हता. त्यासाठी त्यांच्या मुलाने महिनाभरापूर्वी स्मार्ट फोन घेऊन दिला होता. मात्र बाबांनी त्यावरून धार्मिक भावना भडकविणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आणि स्वतःच गोत्यात आले. पोलिसांनी दोन्ही ज्येष्ठ नागरिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून ५० हजारांचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले. यापुढील काळात अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यास ५० हजारांचा दंड आणि गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
















