न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२१) :- लाच प्रकरणी एसीबीने महापालिकेतून स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक), राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक चालक), अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याविरोधात शिवसेनेच्या वतीने आज (शुक्रवारी) महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख सचिन भोसले, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनंत कोऱ्हाळे, धनंजय आल्हाट, रावसाहेब थोरात, सरिता साने, अनिता तुतारे आदी शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या सत्तातूर टोळीमुळे भाजप पुरती बदनाम झाली. भ्रष्टाचार करुन तुंबड्या भरणे हा एकमेव कार्यक्रम राबविणा-या टोळीने भाजपला नाकीनऊ आणले. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ असे म्हणणा-या सत्ताधा-यांनी महापालिकेला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचारात लक्ष घालावे. भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
स्मार्ट सिटी, कचरा संकलन, अमृत योजना, विविध निविदा प्रक्रियेत रिंग होत आहे. पंतप्रधान आवास योजना कामात झालेला भ्रष्टाचार, कचरा निविदेतील रिंग व त्यातून झालेला भ्रष्टाचार, शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामात झालेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत विविध कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार अशी भ्रष्टाचाराची जंत्रीच आहे. तर वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी १ लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचा-यांना आणि समिती अध्यक्षना एसीबीने रंगेहाथ पकडले. यामुळे महापालिकेची राज्यभर बदनामी झाली आहे. सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
‘नही चलेगी नही चलेगी लूटमार नही चलेगी’, ‘चोर भाजप, डाकू भाजप, दरोडेखोर भाजप, बरखास्त करा’, ‘बरखास्त करा महापालिका बरखास्त करा’, अशा जोरदार घोषणा देत शिवसैनिकांनी महापालिका परिसर दणाणून सोडला.
















