- लाचलुचपत विभागाकडून सत्ताधारी भाजप सर्वाधिक वेळा रडारवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२१) :- भाजपच्या सत्ता काळात पिंपरी – चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाईची ९ प्रकरणे घडली आहेत. गेल्या १५ वर्षांतील पालिकेतील गैरव्यवहाराचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. त्या धाडसत्रात मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी अडकले आहेत.
फेब्रुवारी २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचे कारभारी विराजमान झाले. त्यांनी मार्च २०१७ पासून पालिकेची धुरा सांभाळली. भाजपच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात लाच घेतल्याची तब्बल ९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. सन २०१७ मध्ये पालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्वीय सहायकाने लाच घेतल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर महापालिकेचे मुख्याध्यापक, सहायक आरोग्य अधिकारी, लेखाधिकारी, आरोग्य कर्मचारी यांना लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात येऊन अटक करण्यात आली होती.
अधिकारी व कर्मचाऱ्यांनंतर स्थायी समिती कार्यालयावरच छापा टाकण्याचा प्रकार पहिल्यांदाच पालिकेत घडला. त्यात स्थायी समितीच्या अध्यक्ष असलेल्या पदाधिकाऱ्यांस अटक होण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पदाधिकारी नगरसेवकांमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, गेल्या १५ वर्षांत लाच प्रकरणाची तब्बल २७ प्रकरणे उघडकीस आले आहेत. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार पालिकेने निलंबनाची कारवाई केली आहे. पुढे न्यायालयात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची निर्दोष सुटकाही झाली. ते पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.


















