- न्यायालयाला खोटी माहिती देत केली दिशाभूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२१) :- न्यायालयाची दिशाभूल करून अंतरिम जामीन मिळविलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. लांडगे यांनी तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाला आईच्या आईचे (आजीचे) निधन झाले असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या वडिलांची मावशी गेली आहे. त्यांनी न्यायालयाला खोटी माहिती देत दिशाभूल केली असल्याचा युक्तिवाद सहाय्यक सरकारी वकील अँड रमेश घोरपडे यांनी न्यायालयात केला. तो ग्राहय धरीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी हेडाऊ यांनी लाडगेंचा जामीन फेटाळला.
होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी तक्रारदार जाहिरात ठेकेदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार नितीन लांडगे यांच्यासह त्यांचा स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय ५६, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
नितीन लांडगे यांनी आईच्या आईचे निधन झाले असल्याचे सांगून तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. गुरुवारी लांडगे यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी मेडिकल कारणास्तव पुन्हा जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र त्याला सहाय्यक सरकारी वकील अँड रमेश घोरपडे यांनी विरोध केला.