- बारा जणांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२१) :- शाळेची फी न भरलेल्या काही विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला मागण्यासाठी शाळेत आले होते. शिक्षणाधिकारी, पालिका अधिकाऱ्यांना अर्ज दिला होता. त्यावर प्रशासनाने संबंधित पालकांना दाखला न देता मार्कलिस्ट देण्यासाठी सांगितले होते. मात्र, पालकांनी शाळेच्या गेटवर गैरकायद्याची मंडळी जमवून शाळेच्या गेटमधून बेकायदेशीरपणे प्रवेश केला.
दरम्यान शाळेच्या आयटी कन्सल्टंटला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचा व्हिडीओ काढून व्हायरल केला. फिर्यादी यांची बदनामी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार २३ ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास त्रिवेणीनगर येथील सेंट अॅन्स स्कुल येथे घडला. स्टॅफिन फ्रॅन्सिस चेरुवतुर (वय ४०, रा. हडपसर, पुणे) यांनी बुधवारी (दि. २५) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रावसाहेब चंद्रकांत थोरात, गणेश सामल, शाळेतील इयत्ता दहावीच्या वर्गातील चार ते पाच विद्यार्थ्यांचे पालक, रावसाहेब थोरात यांचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.