- जामीन अर्जाची अंतिम सुनावणी सोमवारी; सदस्यांचा जीव टांगणीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२१) :- टेंडरसाठी लाच मागितल्याप्रकरणात ते १६ जण स्थायी समितीचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्या १६ लोकांची चौकशी होत नाही, तोपर्यंत अटक आरोपींना जामीन देण्यात येवू नये. कारण तोपर्यंत तपास पुर्ण होणार नाही, असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी शुक्रवारी केला.
या गुन्ह्यात अटक केलेल्या पाचही आरोपींच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पुर्ण झाला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. अॅन्टी करप्शन विभागाने ते १६ जण म्हणजे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे १६ सदस्य असल्याचं अगदी स्पष्टच न्यायालयात सांगितलं (रिमांड रिपोर्ट) आहे.
त्यामुळे अॅन्टी करप्शन आता स्थायीच्या १६ सदस्यांकडे कसून चौकशी करणार हे स्पष्ट झालं आहे. तपासाबाबतच्या आणखी काही महत्वाच्या गोष्टी देखील अॅन्टी करप्शननं न्यायालयात लेखी स्वरूपात (रिमांड रिपोर्ट) सांगितल्या आहेत. जामीन अर्जावर सोमवारी (दि ३०) निकाल देण्यात येणार आहे.












