- साखरेची पोती चोरी प्रकरण; सांगवी पोलिसांची कारवाई….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२१) :- टेम्पोतील एक लाख १४ हजार ३७६ रुपये किंमतीची ६८ साखरेची पोती चोरीस गेल्याने फिर्यादीनी सांगवी पोलिसांशी संपर्क साधला. त्यांचा दुकानातील कामगारावर संशय होता. मात्र, संशयित कामगार पोलिसांना स्वतःहून पुढे येत तपासाकरिता मदत करीत होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करीत असताना फुटेजमधून एका टेम्पोचा क्रमांक मिळाला.
त्यानुसार टेम्पोवाला आरोपी मुकेश याला पोलिसांनी पकडले. त्यावेळी त्याने साखरेची पोती आरोपी कामगार आणि स्वतः चोरल्याचे कबूल केले. शुक्रवारी (दि. २७) रात्री दहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांनी आपला (एम एच १४ / एच जी ९९५०) टेम्पो पिंपळे गुरव येथील नर्मदा गार्डनसमोरील मोकळ्या जागेत दुकानाजवळ पार्क केला होता.
नरेशकुमार बाबुलाल सारंग (वय २२, रा. नर्मदा गार्डनसमोर, पिंपळे गुरव) यांनी रविवारी (दि. २९) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जगदीश भागीरथराम बिष्णोई (वय २४, सध्या रा. बालाजी फर्निचर, काटेपुरम चौक, पिंपळे गुरव) आणि मुकेश बाबुलाल बिष्णोई (वय १९, रा. दापोडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.












