- स्थायी समिती बरखास्तीची विरोधी पक्षनेत्यांची मागणी..
- आजच्या नियोजित स्थायी सभेला जेलवारी करून आलेल्या अध्यक्षांची उपस्थिती?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेला, शहराला बदनामीचा डाग लावण्याचे काम सत्ताधारी भाजपने केला. पैसे घेताना पकडले गेल्यानंतर देखील महाविकास आघाडीवर भाजपच्या बदनामीचा आरोप करण्याचा सत्तारुढ पक्षनेत्यांचा प्रकार केविलवाणा आहे. घाणेरडे राजकारण करण्याची परंपरा भाजपची आहे. आमची नाही, चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थायी समिती बरखास्त करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली.
सत्तेत असलेल्या भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना अटक झाली. थेट पेसे घेताना त्यांना पकडले गेले. स्थायी समितीच्या दालनात पैसे सापडले. उघड उघड गैरकारभार उघड झाला आणि भाजपचा खरा चेहरा दिसून आला. अटकेबरोबर स्थायीच्या अध्यक्षांना जेलवारीही झाली. यामध्ये तथ्य असल्यामुळेच त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यांच्यावर कारवाई सोडून भाजपकडून बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. स्थायीच्या अध्यक्षांना न्यायालयाकडून जामीन मिळाला असला, तरी निर्दोष मुक्तता झालेले नाही. त्यामुळे त्यांनी स्थायी समितीच्या बैठका घेऊ नयेत. ही आमची भूमिका आहे. भाजपने नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता होती, असे मिसाळ म्हणाले.
स्थायी समितीची आज बुधवारी (दि. १) रोजी नियोजित ऑनलाइन साप्ताहिक सभा होणार की मागील सभेप्रमाणे तहकूब केली जाणार याची उत्सुकता महापालिका वर्तुळात आहे. समितीच्या २५ ऑगस्ट व १ सप्टेंबरच्या सभा विषयपत्रिकेवर कोरोनासंदर्भात उपाययोजना व साहित्य खरेदी, जम्बो रूग्णालय, पाणीपुरवठा, रस्ते, स्थापत्य व वैद्यकीय विभागासह इतर विषय आहेत. सभा होते की मागील आठवड्याप्रमाणे तहकूब होते, याची पालिका वर्तुळात उत्सुकता आहे.












