- तीन दुचाकी आणि एक रिक्षा चोरीला; गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरातील भोसरी, निगडी आणि वाकड परिसरातून वाहने चोरीला गेली आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. ३०) संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धनश्री विठ्ठल सुतार ऊर्फ धनश्री आकाश जाधव (वय २५, रा. गवळीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची ३५ हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी आळंदी रोड भोसरी येथील मयूरी मंगल कार्यालयासमोर पार्क केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला.
हनुमान रूपनारायण गुप्ता (वय ६१, रा. गंगानगर, आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गुप्ता यांनी त्यांची १२ हजार रुपये किमतीची दुचाकी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घरासमोर पार्क केली. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार ३० ऑगस्टला सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला.
उत्तरेश्वर दतू वाघमारे (वय ४४, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी वाघमारे यांनी प्रेमानंद भगवान सकट यांची रिक्षा शिफ्टने चालवण्यासाठी घेतली होती. २८ ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास त्यांनी ओटास्कीम, निगडी येथे रिक्षा पार्क केली. दरम्यान, रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची ७० हजार रुपये किमतीची रिक्षा चोरून नेली. हा प्रकार २९ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलिस करीत आहेत.
अंगद गणपतराव जाधव (वय ३४, रा. रामनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी २५ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरासमोर पार्क केली. दरम्यान, रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार २६ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आला. वाकड पोलिस तपास करीत आहेत.