- उपमुख्यमंत्री अजितदादांचा त्यांना इशारा; भाजपवरही तोंडसुख…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ सप्टेंबर २०२१) :- ‘राजीनामा घ्यावा की, नाही हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, आपल्या पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात अशा पद्धतीची घटना कधी घडली नव्हती. महापालिकेत भाजपची सत्ता असताना अशी प्रकारची घटना घडली. हे शहरातील सर्व नागरिक उघड्या डोळ्याने बघत आहेत. मी १९९१ पासून २०१७ पर्यंत २० वर्षे या शहराचे नेतृत्व केले. परंतु, अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टी होऊ दिल्या नाहीत, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थायीच्या लाच प्रकरणातील त्या कारवाईबाबत व्यक्त केले.
चिंचवड येथील एका खासगी कार्यक्रमाला आज (शुक्रवारी) ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, जर यदा कदाचित छोटी-मोठी घटना झाली. तर, तिथल्या तिथे संबंधितांवर कडक ‘अॅक्शन’ घेण्यासाठी मी मागेपुढे बघितले नाही. जनतेचे प्रतिनिधीत्व करत असताना जनतेच्या कररुपाने गोळा झालेल्या पैशांवर अशा प्रकारचा डल्ला मारण्याकरिता जर कोणी पुढाकार घेत असतील. तर, हे पिंपरी-चिंचडकरांचे दुर्दैव आहे’. ‘लाच प्रकरणाच्या कारवाईचा तपास पोलिसांच्या पद्धतीने चालू आहे. या प्रकरणाचा अहवाल मागविण्याचा अधिकार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आहे. त्यात जे कोणी दोषी असतील. ते जर उद्या राष्ट्रवादीशी संबंधित असतील. तर, राष्ट्रवादी त्यासंदर्भात निश्चितपणे योग्य ती कारवाई करेल’, असेही पवार यांनी स्पष्ट केले.


















