- ३ दिवसांत खुलाशाची मागणी; गुन्हा दाखल असूनही पालिकेचा चौकशीचा फेरा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२१) :- रस्ते सफाईसाठी कामगार पुरविणारे गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर व घरोघरचा कचरा जमा करून मोशी कचरा डेपोत वाहून नेणारे ए. जी. इन्व्हायरो या दोन ठेकेदारांविरुद्ध कामगारांनी पालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. या दोन ठेकेदार एजन्सीच्या विरोधात पालिकेने पोलिसांत तक्रार दिली आहे. याउलट आयुक्तांमार्फत चौकशी समितीने या दोन ठेकेदारांची चौकशी केली आहे. दोन्ही ठेकेदारांवर फसवणुकीचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. पालिकेने या दोन्ही एजन्सीला नोटीस बजावली असून ३ दिवसांत खुलासा करण्यास बजावले आहे.
पालिकेच्या तक्रारीनुसार गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चरच्या १५ अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. तर, ए. जी. इन्व्हायरोवर अद्याप फौजदारी कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, कामगारांना नियुक्ती पत्र न देणे, वेतन उशिराने देणे, पीएफ व ईएसआय जमा न करणे, वेतन चिठ्ठी न देणे, किमान वेतन कायद्यानुसार वेतन न देणे, कामगार व वाहनचालकांना कमी वेतन देणे असे प्रकार निदर्शनास आले आहेत.
आर्थिक फसवणुकीबरोबर निविदेच्या अटी शर्तींचा आणि करनाम्याचा भंग झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून संबधित ठेकेदारांवर फौजदारीसह काम काढून घेणे व काळ्या यादीत टाकण्याची कारवाई होऊ शकते. तसेच , इतर ठेकेदारांचीही कागदपत्रे तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात दोषी आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संबंधित ठेकेदारांवर चौकशी समितीच्या अहवालात विविध आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने संबंधितांना नियमानुसार नोटिसा बजावल्या आहेत. खुलासा करण्यासाठी ३ दिवसांची मुदत आहे. त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे आरोग्य विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.