- शाडूमातीच्या मूर्ती खरेदीकडे गणेशभक्तांचा कल..
- ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ उपक्रमासही नागरिकांचा प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२१) :- गेल्या वर्षी कोरोनामुळे मूर्तीची विक्री कमी झाली. तसेच, चार फूट उंचीच्या मर्यादमुळे अनेक मूर्तिकारांकडे आठ ते दहा फुटांच्या मूर्ती पडून आहेत. गेल्या काही वर्षांपासून शाडूमातीचे गणपती घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. गणेशमूर्तीच्या किमती तीनशे रुपयांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत आहेत.
यंदा गणेशमूर्तीच्या किमतीत २० टक्के वाढ झाली आहे. बाजारपेठत मूर्ती, तसेच महालक्ष्मीचे मुखवटे विक्रीसाठी सज्ज आहेत. यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे मोठ्या मंडळांच्या गणपतीच्या मूर्तीची उंची कमी झालेली आहे. एकीकडे सार्वजनिक गणपती मंडळ साधेपणाने उत्सव साजरा करणार असले, तरी दुसरीकडे घरगुती गणेशमूर्ती तयार करण्याची लगबग संपली आहे. कोरोनामुळे आलेल्या मर्यादांमुळे कलाकारांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.
पीओपी हे पर्यावरणासाठी घातक असल्याने सरकारतर्फे गणेशमूर्ती या जास्त उंचीच्या बसवू नयेत यासह शाडू मातीच्या गणपतीची स्थापना करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात अनेकांनी शाडूमाती आणि पीओपीच्या मूर्ती तयार करून विक्रीसाठी ठेवल्या आहेत.
चिंचवडमधील शंकर महाराज सेवा मंडळ आपल्याला आवडेल त्या गणेशमूर्तीची निवड करायची आणि त्या मूर्तीची आपल्याला योग्य वाटेल एवढी किंमत तेथील दानमंदिरामध्ये ठेवण्यात आलेल्या पाकिटामध्ये जमा करायची, असा ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या अभिनव उपक्रम राबवीत आहे. मूर्ती शाडू मातीपासून बनवलेल्या व पर्यावरणपूरक आहेत. माती, हळद, कुंकू, बुक्का गुलाल, गेरू अशा शंभर टक्के नैसर्गिक वस्तूंपासून बनविलेल्या मूर्तीची विक्री केली जाते. १० सप्टेंबरपर्यंत सकाळी ते रात्री ९ या वेळेत श्रीराम मंदिर, चापेकरवाडा, चिंचवडगाव या ठिकाणी या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. दगडूशेठ हालवाई, जय मल्हार, बाजीराव, लालबागचा राजा, पेशवा गणपतीची आदी प्रतिकृती आहेत, अशी माहिती शंकर महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष अविनाश वैद्य यांनी दिली.












