- वाहनतळ व वॉटर पार्क परस्पर ठेकेदाराला बहाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२१) :- निगडीतील इंदिरा गांधी उद्यान (अप्पू घर) येथील वॉटर पार्क व वाहनतळ भाडेतत्त्वाने एका ठेकेदाराला तब्बल ३० वर्षांसाठी देण्यात आले आहे. जागा किंवा मालमत्ता भाडे तत्वावर देण्याचा अधिकार भूमी व जिंदगी विभागास आहे. त्या विभागास विश्वासात न घेता पालिकेच्या विद्युत विभागाने परस्पर वाहनतळ भाड्याने दिला आहे.
उद्यानातील वॉटर पार्क व वाहनतळ तब्बल ३० वर्षे कराराने भाडे तत्वावर देण्यास स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे. जागा व मालमत्ता भाडेतत्त्वाने देण्याचा अधिकार भूमी व जिंदगी विभागाचा आहे. त्या नियमांचे उल्लंघन करीत विद्युत विभागाने तो करार केला आहे. संबंधित ठेकेदाराने भाडे व इतर शुल्क भरलेले नाही. थकीत भाडे वसूल न करता वॉटर पार्क व वाहनतळाचे तब्बल दोन वर्षांचे भाडे माफ करण्यात आले आहे.
शहरात सर्व नागरिक नियमितपणे मिळकतकर भरतात. मुदतीमध्ये कर न भरल्यास त्याच्यावर जप्तीपूर्व कारवाई केली जाते. त्याच्यावर मोठा दंड केला जातो. करातून महिला, ज्येष्ठ नागरिक, अंध, दिव्यांग असे कोणालाही सूट दिली जात नाही, असे असताना ठराविक ठेकदाराला तब्बल २ वर्षांचे लाखांचे भाडे माफ करणे ही शहरवासीयांची फसवणूक आहे. या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदारांकडून सर्व भाडे वसूल करावे, अशी मागणी भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.












